Tuesday, February 8, 2011

बेसनाची गोड पोळी

साहित्य - दोन वाट्या बेसन, अर्धी वाटी साजूक तूप, दीड ते दोन वाट्या पिठीसाखर, अर्धा चमचा अगदी बारीक केलेली वेलची व जायफळाची पूड, थोडेसे दूध, अर्धी वाटी मैदा, दोन वाट्या कणीक, मोहनासाठी थोडे जास्त तेल, चवीपुरते मीठ.

कृती - जाड बुडाच्या कढईत आपण लाडूसाठी जसे बेसन भाजतो अगदी तसेच तुपात गुलाबी रंगावर भाजून घ्या. गॅस बंद करून बेसनावर दुधाचा हबका मारा. हलवून थंड होऊ द्या. त्यात वेलचीची पूड व पिठीसाखर मिसळून ठेवा.

कणीक व मैदा मैद्याच्या चाळणीने चाळून घेऊन मीठ घालून अर्धा तास भिजवून ठेवा. पोळी करण्यापूर्वी तेल घालून तो गोळा खूप मळून घ्या. अगदी मऊ झाला पाहिजे. हाताने छोट्या गोळ्याची वाटी तयार करून त्यात गोड बेसन भरा. सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करून हलक्‍या हाताने सुकी कणीक लावून लाटा. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा. ही पोळी अगदी पुरणपोळीसारखीच लागते.

मसाला भाकरी

साहित्य - भाकरीचे पीठ, हिरवी मिरची, आलं- लसूण पेस्ट, कोथिंबीर व मीठ.

कृती - भाकरीचे पीठ घेऊन त्यात हिरवी मिरची- आलं- लसूण पेस्ट व मीठ, कोथिंबीर हे सर्व घालून एकत्र भाकरी करताना मळून घेतो असे मळून घ्यावे व नंतर नेहमीप्रमाणे भाकरी करावी. लहान मुले भाकरी खाण्याचा कंटाळा करतात; पण उन्हाळ्यात ज्वारी थंड असते. अशी भाकरी केल्यास मुले आनंदाने खातात. भाकरीबरोबर लोणी किंवा तूप घेऊन खावे.

मणगने

गोव्यात कडबु पुरणपोळी पेक्षा सोपा असा मणगने हा पदार्थ बनवला जतो. लग्नप्रसंगी हा पदार्थ केल जातो.

साहित्य- एक वाटी तांदुळ, अर्धी वाटी हरभरा डाळ, ओले खोबरे-किसलेले अर्धी वाटी व थोदेसे तुकडेही, एक चम्चा खसखस, कजु तुकडे, एक वाटी गुळ,वेलची पावडर.

कृती- हरभरा डाळ स्वछ धुऊन दहा मिनिटे भिजत ठेवावी. तांदुळ धुऊन घ्यावेत. दोन्ही मिळुन जाड बुडाच्या मोठ्या पातेलात शिजत ठेवावे. डाळ नीट शिजली की त्यात गुळ, खोबरे, खसखस, काजुचे तुकडे घालावेत. अर्धा चमचा साजुक तुप घालावे. वेलची पूड घालावी.
हा पदार्थ पातळच असतो. करण्यास अत्यंत सोपा व पुरवठ्याला उत्तम.

रवा गुळाची साटोरी

साहित्य : दिड वाटी कणिक, १ वाटी मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, ४ टेस्पुन तुपाचे / रीफाईंड तेलाचे मोहन, तांदळाचे पीठ.

सारण : १ वाटी बारीक रवा, १ वाटी किसलेले सुके खोबरे, १ वाटी जाडसर दळलेली कणीक किंवा बेसन, २ वाटी चिरलेला गुळ,, २ टेस्पुन भाजुन खसखस पुड, वेलची जायफळ पुड.

कृती : प्रथम साजुक तुपावर रवा अगदी खमंग भाजवा, मधुन मधुन पाण्याचा शिपका द्यावा म्हणजे फुलेल. नंतर तो बाजुला ठेवुन त्याच कढईत तुपावर कणिक वा बेसन खमंग भाजुन घ्यावे. खोबरेही गुलाबीसर भाजावे. रवा, खोबरे, कणीक / बेसन एकत्र करुन त्यात खसखस वेलची जायफळ पुड मिसळावी. गुळात चमचाभर पाणी घालुन तो वितळवुन घ्यावा. जरा कोमट असताना त्यात इतर सर्व साहित्य घालावे अन एकजीव करुन ठेवावे

पारीसाठी कणिक, रवा, मैदा एकत्र करुन त्यात मीठ व मोहन घालुन घट्ट मळावे. तासाभराने पुन्हा मळुन त्याचे पेढ्याएवढे गोळे करावे. अन सारण भरुन उंडा करुन नेहेमीप्रमाणे साटोर्‍या कराव्यात. या डीप फ्राय केल्या तरी चालतात, अन टिकतात.

खजुराची साटोरी

साहित्य : दीड वाटी मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, अर्धी वाटी कणिक, ३ टेस्पुन पातळ तुप, चिमुट मीठ, पाणी वा दुध, तांदळाचे पीठ, तुप.

सारण : ४०० gm बीनबियांचा खजुर, अर्धी वाटी पिठीसाखर, पाव वाटी मिल्क पावडर, अर्धी टीस्पुन वेलची पुड, पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट.

कृती : खजूर धुवुन कापडावर पसरुन कोरडा करावा. नंतर बारीक चिरुन मिक्सरमध्ये वाटुन घ्यावा. त्यात इतर सर्व सारणाचे साहित्य मिसळुन एकजीव करुन ठेवावे.

रवा, मैदा, कणिक, तुप व मीठ एकत्र करुन पाण्याने वा दुधाने घट्ट मळावे. तासभर झाकुन परत मळुन नेहेमीप्रमाणे साटोर्‍या कराव्यात. यात डेसिकेटेड कोकोनट ऐवजी अक्रोड पुड पण घातली तरी चालते

काजूची साटोरी

साहित्य : दिड वाटी मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, चिमुट मीठ, दुध, तांदळाचे पीठ, ३ टेस्पुन गरम तुपाचे मोहन, तुप.

सारण : दिड वाटी काजूची पुड, अर्धी वाटी खवा, २ टेस्पुन घट्ट साय, दिड वाटी पिठीसाखर, पाव टीस्पुन दुधात भिजवलेले केशर, वेलची जायफळ पुड.

कृती : कढईत खवा कोरडाच परतावा. त्यात काजुची पुड घालुन थोडे परतावे व लगेच आंचेवरुन उतरावे. मिश्रण गार झाले की त्यात वेलची जायफळ पुड, पिठीसाखर, केशर अन साय घालुन मळुन एकजीव करावे.

पारीसाठीचे साहित्य एकत्र मळुन पोळीपेक्षा घट्ट भिजवावे. तासाभराने त्याचे उंडे करुन त्यात सारण भरुन नेहेमीप्रमाणे साटोर्‍या कराव्यात. मात्र या डीप फ्राय करु नयेत. तव्यावर आधी शेकुन मग कडेने साजुक तुप सोडुन तळाव्यात

खव्याची साटोरी

साहित्य : १ वाटी बारीक रवा, १ वाटी मैदा, २ टेस्पुन कडकडीत तुपाचे मोहन, चिमुट मीठ, दुध, तांदळाचे पीठ, तुप.

सारण : पाव किलो खवा, अर्धी वाटी रवा, १ टेस्पुन भाजलेली खसखस, २ वाटी पिठीसाखर, वेलदोडा जायफळ पुड, तुप.

कृती : साजुक तुपावर रवा मधुन मधुन दुधाचा शिपका मारुन खमंग भाजुन फुलवुन घ्यावा. तो बाजुला ठेवुन त्याच कढईत खवा तुप सुटेपर्यंत कोरडाच भाजावा. दोन्ही कोमट झाले की त्यात खसखस पुड, पिठीसाखर अन वेलची जायफळ पुड घालुन एकजीव करावे.

रवा व मैदा एकत्र करुन त्यात तुपाचे मोहन व मीठ घालुन दुध किंवा पाण्याने घट्ट भिजवावे. तासाभराने कुटुन मळुन त्याचे लहान गोळे करावे त्यात सारणाचा दिडपट गोळा भरुन उंडा तयार करावा वा हातावर तो थापुन चपटा करावा. हा तयार उंडा तांदळाच्या पीठावर पुरी एवढा लाटुन प्रम्थम नॉनस्टीक तव्यावर मंद आंचेवर दोन्ही बाजुनी कोरडा शेकावा, डाग पडु देऊ नये. नंतर लगेच ही साटोरी तुपात तळावी. टिकण्यासाठी करायची असल्यास डीप फ्राय करावी. २ ते ३ दिवसात संपवायची असेल तर तुप सोडुन shalow fry केली तरी चालते.