Saturday, February 5, 2011

मिरवणी

मिरवणीत सगळेच घटक उष्ण पडणारे असल्यामुळे ही आमटी खूप थंडित किंवा पावसाळ्यात खातात.


अर्धा डोल सुकं खोबरं
८-१५ मिरे (किती तिखट चालेल यावर अवलंबून)
५ लसूण पाकळ्या
एक मध्यम आकाराचा कांदा (न घेतल्यास चालतो)
मीठ
१ आमसुल
तुप किंवा तेल १छोटा चमचा
जीरं पाव चमचा
कृती:
* खोबरं गॅसवर भाजून घ्यावं वरून किंचित काळं होईपर्यंत. घरात स्मोक डीटेक्टर असणार्‍यांनी विकतचा खोबर्‍याचा चुरा तव्यावर खरपूस परतून घ्यावा.
* कांदा घेणार असाल तर तो देखील सोलून त्याला " + " अश्या खाचा देऊन भाजून घ्यावा.
* मिरं, खोबरं (भाजून तुकडे करून), कांदा (परत एकदा, नसला तरी चालतो) लसूण आणि मीठ एकत्र करून मिक्सरमधून अगदी बारिक वाटून घ्यावं. वाटताना पाणी शक्य तितकं कमी घालून.
* तेल जीर्‍याची फोडणी करून त्यावर अगदी अर्धा मिनिट वाटण परतावं.
* यावर दोन कप उकळीचं पाणी घालून अमसूल घालून ४-५ मिनिटं उकळू द्यावं
चवदार मिरवणी तयार.
भाताशी खायला उत्तम! यात हवं असल्यास शिजलेल्या तुरीच्या किंवा मुगाच्या डाळीचा गोळा घालावा. (त्याबरोबर जरासा गुळ पण). तसंच अंड खाणार्‍यांना यात उकडलेलं अंड घालता येईल. मिरवणीला उकळी येताना त्यात अंड फोडून पण टाकतात.
** खोबरं, कांदा भाजताना फार जाळल्या जाऊ नये. नाहीतर कडवटपणा येतो.

 

No comments:

Post a Comment