Tuesday, February 8, 2011

मिश्र डाळींचा पराठा

मिश्र डाळींचा पराठा.
मुंबईत हल्ली मिश्र डाळी बाजारात मिळतात. अर्थात घरीहि अश्या मिसळुन ठेवता येतील. तुर, मुग, मसुर आणि ऊडिद डाळी मिसळुन घ्याव्यात. त्यात थोडे पिवळे वा हिरवे मुग घातले तरी चालतील. ऊडदाची डाळ जरा कोरडीच भाजुन घेतली तर छान.
या डाळी घोळुन धुवुन घ्याव्यात. स्वच्छ पाणी निघेस्तो धुवाव्यात. मग दोन तीन तास भिजत ठेवाव्यात. नीट भिजल्या कि निथळुन त्याला हळद व हिंग चोळुन, पाणी न घालता, कुकरच्या डब्यात आठ मिनिटे ऊकडुन घ्याव्यात. ( याची दाल फ़्रायहि करता येते ) मग थंड झाले कि लसुण व हिरवी मिरची घालुन मिक्सरमधुन काढाव्यात. त्यात मीठ, हिंग व लाल तिखट घालावे. दोन कप पुरण असेल तर अर्धा चमचा सुंठ पावडर घालावी. हे मिश्रण खुपच कोरडे होते. त्यात ओलेपणासाठी, एक लहान कांदा किसुन घालावा. सारण जरा जास्त तिखटच हवे. तसेच त्यात अर्धा चमचा साखरहि घालावी.

एवढ्या प्रमाणासाठी दोन कप कणीक घ्यावी. त्यात मुठभर कोथिंबीर बारिक करुन घ्यावी. किंचीत हळद, हिंग, मीठ व तेल घालुन चपातीपेक्षा थोडी घट्ट कणीक मळावी.
सारनाचे सहा भाग करुन, कणकेचे ऊंडे करुन त्यात सारण भरावे. हे ऊंडे काळजीपुर्वक करावे, कारण पराठे लाटताना फ़ुटायची शक्यता असते.
तांदळाच्या पिठीवर जाडसर पराठे लाटुन, मंद आचेवर तेल सोडुन दोन्हीकडुन भाजुन घ्यावेत. खाली ऊतरुन वर तुप लावावे व वरुन चाट मसाला शिवरावा. दह्याबरोबर खावेत

No comments:

Post a Comment